
परभणी, 26 डिसेंबर (हिं.स.)। येथील बजरंगी हनुमान चालीसा मंडळाच्या वतीने रविवारी 28 डिसेंबर रोजी 108 हनुमान चालीसा सामूहिक पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विष्णू नगरातील महेश मंदिरात सकाळी 8 वाजल्यापासून सामूहिक पठण सुरू होईल, तर संध्याकाळी 6.30 वाजता महाआरती संपन्न होणार आहे. यानिमित्त महेश मंदिर परिसरात 2100 दिवे पेटवून प्रकाशोत्सव साजरा केला जाणार आहे. मंडळाची सुरुवात 2010 साली चार हनुमान भक्तांनी केली होती आणि दर शनिवारी हनुमान चालीसा पठणाचे आयोजन सुरू झाले. आता हा उपक्रम शहरातील जवळपास 51 कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे. मंडळातील सदस्य दर शनिवारी रात्री 10 ते 11 या वेळेत एका सदस्याच्या घरी जमतात आणि हनुमान चालीसाचे सात पाठ, दोन भजन व श्रीराम स्तुतीसह आरती करतात. कोरोना काळात सामूहिक पठणावर मर्यादा होत्या; तरी सर्व सदस्यांनी वैयक्तिक पठण सुरू ठेवले. मोठा सण शनिवारला आला तर सामूहिक पठण मंगळवारी होईल. या उपक्रमात व्यापारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, वकील, नोकरदार यासह महिला, पुरुष व लहान मुलेही उत्साहाने सहभागी होतात. बजरंगी हनुमान चालीसा मंडळ रामनवमीच्या दिवशी शोभायात्रेदरम्यान सर्व भाविकांना थंड पेय वाटपाचा उपक्रमही राबवते. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात 108 भाविकांनी सहभागी होऊन 16 हजार हनुमान चालीसाचे सामूहिक पठण केले होते. पठणामुळे मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा, अडचणींवर मात करण्याची शक्ती तसेच आत्मविश्वास वाढतो, असे भाविकांचे म्हणणे आहे. आयोजकांनी या वर्षीच्या उपक्रमात वेळेचे कुठलेही बंधन नसल्याचे सांगितले असून, दिवसभरात कधीही भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis