अशा लोकांशी युती शक्यच नाही, नवनीत राणांचा संजय खोडकेंवर गंभीर आरोप
अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.) भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे आमदार संजय खोडके यांच्यावर गंभीर आरोप करत थेट राजकीय युती नाकारली आहे. संजय खोडके हे चोर, गोळीबार करणारे व चाकूधारी गुन
अशा लोकांशी युती शक्यच नाही – नवनीत राणांचा संजय खोडकेंवर गंभीर आरोप


अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.)

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे आमदार संजय खोडके यांच्यावर गंभीर आरोप करत थेट राजकीय युती नाकारली आहे. संजय खोडके हे चोर, गोळीबार करणारे व चाकूधारी गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहतात, असा आरोप करत अशा लोकांशी कोणताही राजकीय संबंध ठेवणे शक्य नसल्याचे राणा यांनी स्पष्ट केले.राणा व खोडके यांच्यातील राजकीय संघर्ष नवीन नसून, आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अलिकडेच संजय खोडके यांनी भाजपने आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाशी युती केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपशी कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही, असे विधान केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या की त्यांनाही संजय खोडकेंचा पाठिंबा नको आहे.खोडके धार्मिक चादर अर्पण करणाऱ्यांना आणि त्यातून आर्थिक लाभ मिळवणाऱ्यांना पाठिंबा देतात, तसेच गुन्हेगारांना संरक्षण देतात, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला. अशा लोकांशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्या म्हणाल्या.राज्य पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) महायुतीत सहभागी असला, तरी अमरावतीत राणा व खोडके यांच्या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर महायुतीत फूट पडल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले होते की अमरावतीत भाजपची स्थानिक युती राष्ट्रवादी काँग्रेससोबत नसून युवा स्वाभिमान पक्षासोबतच असेल. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.त्यावर प्रत्युत्तर देताना संजय खोडके यांनी रवी राणा हे भाजपचे अधिकृत प्रवक्ते नसून त्यांनी पक्षाचे लाऊडस्पीकर बनण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका केली होती. तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी पोस्टरवर नाव व फोटो वापरण्यास खोडकेंनी परवानगी दिली नव्हती, तसेच अजित पवारांच्या रॅलीतही ते अनुपस्थित राहिले होते.या सर्व पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांच्या ताज्या विधानानंतर अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्यात युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली असून, राणा दाम्पत्य आणि संजय खोडके यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande