
सोलापूर, 26 डिसेंबर (हिं.स.)। अक्कलकोट तालुक्यातील ‘तोळणूर येथे पाझर तलावाचा बंधारा फोडून मुरूम उपसा’ या मथळ्याखाली दैनिक ‘पुढारी’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच महसूल प्रशासनाने तत्काळ पंचनामा करीत अहवाल तहसील प्रशासनास सादर केला आहे. त्यामुळे तहसील व जलसंधारण विभाग कारवाईसाठी अॅक्शन मोडवर आले आहे.या पंचनाम्यात केवळ आठ ब्रास मुरुम उपसा हा 8 फूट लांबी व 2 फूट रुंदीने जेसीबीच्या साहाय्याने केल्याचा उल्लेख आहे.
घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा झाल्याचे दिसून येते. त्यामुळे पंचनामा केलेल्या महसूल अधिकार्यांनी हा पंचनामा संबंधितांना पाठीशी घालण्यासाठी तर केला नसेल ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तहसीलदार विनायक मगर यांना प्रत्यक्षात भेटून मुरुम उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर त्यांनी असा प्रकार घडलेला असल्यास सदर पंचनामा फेटाळून पुन्हा नव्याने पंचनामा करण्याचे आदेश महसूल विभागास देणार असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड