सोलापूरात काँग्रेस 50, उबाठा 27, राष्ट्रवादी (शप) १८ जागांवर सहमती?
सोलापूर, 26 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्व 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी
सोलापूरात काँग्रेस 50, उबाठा 27, राष्ट्रवादी (शप) १८ जागांवर सहमती?


सोलापूर, 26 डिसेंबर (हिं.स.)।

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्व 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सोलापुरात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे आणि माकप यांच्यातील जागावाटपावर प्राथमिक एकमत झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला 50 ते 55 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 27 ते 29 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 17 ते 18 जागा तर माकपला 8 ते 10 जागा देण्यावर सहमती झाली आहे. मनसेसह काही जागांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती आहे.सोलापुरातील महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात काल संध्याकाळी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बहुतेक जागांवर एकमत झाले असले तरी 7 ते 8 जागांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. मात्र उर्वरित बहुतांश जागांचे वाटप निश्चित झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. आज या ठरलेल्या फॉर्म्युल्याची माहिती संबंधित सर्व पक्ष आपापल्या प्रदेश कार्यालयांना कळवणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande