
पुणे, 26 डिसेंबर (हिं.स.)। हिंजवडी आयटी पार्क परिसरात घरांना मागणी अधिक असल्याने तिथे नवीन गृहप्रकल्पांची संख्याही जास्त आहे. या गृहप्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत आहे. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला आहे. याबाबत नागरिकांकडून शासकीय यंत्रणांकडे वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. याची दखल घेऊन ‘एमआयडीसी’ने आयटी पार्कमधील चार विकासकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हिंजवडी आयटी पार्क टप्पा क्रमांक तीनमधील मेगापोलीस सोसायट्यांच्या परिसरातील गोदरेज प्रॉपर्टीज, पेगसिस प्रॉपर्टीज, रेयांश लॉजिस्टिक्स आणि गेरा डेव्हलपमेंट्स यांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिशीत म्हटले आहे की, मेगापोलीस सोसायट्यांमधील नागरिकांकडून बांधकामांमुळे वाढलेल्या हवा व ध्वनिप्रदूषणाबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. या परिसरात चार विकासकांचे गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु