
नांदेड, 26 डिसेंबर, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले असून हा विजय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली मिळाला आहे. त्यामुळे अभिनंदनचा ठराव माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीच्या बैठकीत मांडला.
नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश प्राप्त झाले आहे.
उमरी, लोहा आणि देगलूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणूनही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाच पसंती दिली आहे. जिल्ह्यातील एकूण नगरसेवकांच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. या यशाचे शिल्पकार हे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर असून त्यांचे अभिनंदन करण्याचा ठराव माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी मांडला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर काल दिनांक 23 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष या संपर्क कार्यालयात पार पडली यावेळी हा ठराव मांडून आ. चिखलीकर यांचे अभिनंदन करण्यात आले.
या बैठकीस माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार तथा शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, बाळासाहेब पाटील रावणगावकर जिल्हाध्यक्ष रॉ.कॉ.नांदेड उत्तर, माधव पावडे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड, व्यंकटराव पाटील गोजेगावकर प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,मोहमद खान पठाण, प्रदेश सरचिटणीस रॉ.कॉ.पार्टी, सुरजितसिंघ गिल, माजी उपमहापौर मनपा नांदेड, सुनिल नानवटे प्रदेश सचिव रॉ.कॉ.पार्टी, साबेर चाऊस माजी नगरसेवक मनपा नांदेड, श्रीधर नागापूरकर कार्यालय सरचिटणीस शहर या कौर कमिटीत आदीची उपस्थिती होती.
नगरपरिषदा निवडणुका जिंकाल्यानंतर आता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका मोठ्या ताकतीने निवडून लढून नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करायचा आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणूनही राष्ट्रवादी काँग्रेसच राहिला पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी , कार्यकर्त्यांनी आणि निवडून आलेल्या नगरसेवक नगराध्यक्षांनी ही प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन या निमित्ताने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis