
लातूर, 26 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना व्हॉट्सॲपवर विविध सेवांची माहिती मिळावी, तसेच त्यांना एखाद्या समस्या, तक्रारीची ऑनलाईन नोंद करता यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने 'सेवा सेतू' हे व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू केले आहे. सुशासन सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या उपक्रमाच्या क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, अहिल्या गाठाळ, गणेश पवार, सायली ठाकूर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
'सेवा सेतू' हा व्हॉट्सॲप चॅटबॉट नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण डिजिटल उपक्रम आहे. या माध्यमातून नागरिक आता घरबसल्या शासकीय योजना, प्रमाणपत्रे आणि सेवांबाबत माहिती मिळवू शकतात, तक्रारी नोंदवू शकतात तसेच त्यांची स्थिती तपासू शकतात. हा चॅटबॉट ९५२९०९३०२२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर उपलब्ध असून, केवळ Hi असा संदेश पाठवून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून सेवा सुरू करता येईल.
या सुविधेद्वारे नागरिकांना शासकीय योजना, प्रमाणपत्रे आणि आवश्यक सेवांबाबत माहिती, तसेच विविध शासकीय सेवांबाबत तक्रार नोंदवणे, तक्रारीची स्थिती तपासणे आणि अद्ययावत माहिती मिळविणे, जिल्ह्यात कार्यरत आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत मिळणाऱ्या सेवांबाबत सूचना किंवा अभिप्राय नोंदवणे सोईचे होणार आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध राहणार असून, तक्रार नोंदवणे, तत्काळ कार्यवाही आणि पारदर्शकता हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाशी नागरिकांचा संवाद अधिक सोपा, जलद आणि पारदर्शक होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis