
नवी दिल्ली, 26 डिसेंबर (हिं.स.) । पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या यशस्वी आणि सखोल तपासामुळे पाकिस्तानमधील दहशतवादी सूत्रधारांना ठोस आणि कडक संदेश देण्यात आला असून, या तपासामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज, शुक्रवारी केले. नवी दिल्ली येथे आयोजित अँटी-टेररिझम कॉन्फरन्स–2025 च्या उद्घाटनप्रसंगी शाह बोलत होते.
याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पहलगाम हल्ल्याचा तपास हा भारताच्या मजबूत आणि प्रभावी दहशतवादविरोधी क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय जनतेने आणि सुरक्षा दलांनी एकत्र येत दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे त्यांनी नमूद केले. देशभरातील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये अधिक समन्वय आणि कार्यक्षमता साधण्यासाठी सर्व राज्यांमध्ये एकसमान अँटी-टेररिझम स्क्वाड (एटीएस) संरचना लागू करण्याची गरज असल्यावरही शहा यांनी भर दिला. यासाठी सर्व राज्यांच्या पोलीस महासंचालकांना शक्य तितक्या लवकर समान एटीएस फ्रेमवर्क राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) हा कॉमन एटीएस फ्रेमवर्क विकसित केला असून तो आधीच राज्य पोलीस दलांसोबत शेअर करण्यात आला आहे. या एकसंध संरचनेमुळे संभाव्य धोके वेळेत ओळखणे, गुप्तचर माहिती प्रभावीपणे शेअर करणे आणि संयुक्त दहशतवादविरोधी कारवाया राबवणे अधिक सुलभ होणार आहे.याशिवाय, राज्यांच्या एटीएस युनिट्सनी नॅशनल इंटिग्रेटेड डेटाबेस आणि नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड या राष्ट्रीय गुप्तचर प्लॅटफॉर्मचा नियमित आणि अनिवार्य वापर करावा, असे निर्देशही शहा यांनी दिले. या प्रणाली तपासांची दिशा भरकटू न देता विविध प्रकरणांमधील लपलेले दुवे उघड करण्यास मदत करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी