पद्म पुरस्कार आणि भारतरत्न हे नावासोबत लावता येणार नाहीत- हायकोर्ट
मुंबई, 26 डिसेंबर (हिं.स.) : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार उपाधी नाहीत आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावापूर्वी किंवा नंतर वापरता येत नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. सुनावणी दरम्यान,
मुंबई उच्च न्यायालय लोगो


मुंबई, 26 डिसेंबर (हिं.स.) : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार उपाधी नाहीत आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावापूर्वी किंवा नंतर वापरता येत नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

सुनावणी दरम्यान, 2004 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर हे याचिकेतील एक पक्ष होते. त्यांच्या नावासह केस शीर्षकात पद्मश्री डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर असा उल्लेख केला होता. न्यायालयाने या वापरावर आक्षेप घेत, कायद्यानुसार हे बेकायदेशीर असल्याचे सांगितले. न्या. सोमशेखर सुंदरेसन यांनी सांगितले की, 1995 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की पद्म पुरस्कार आणि भारतरत्न ही उपाधी नाहीत आणि नावापूर्वी किंवा नंतर वापरली जाऊ नयेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय संविधानाच्या कलम 141 अंतर्गत सर्वांना लागू असल्याने, त्याचे काटेकोर पालन आवश्यक आहे.

पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी आहेत आणि तीन श्रेणींमध्ये दिले जातात – पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. हे कला, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिले जातात. 2025 मध्ये एकूण 139 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले होते, ज्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्रींचा समावेश होता. यावर्षी क्रिकेटपटू आर. अश्विनसह अनेक नावाजलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande