
सोलापूर, 26 डिसेंबर (हिं.स.)। श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या सोलापुरातील ६८ लिंगांचा जिर्णोद्धार केला जाणार आहे. १२ व्या शतकातील या लिंगांचा पहिल्यांदाच जिर्णोद्धार होणार आहे. त्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात सहा कोटी ८० लाख रुपयांचा निधी मागितला होता. या कामासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सुरवातीला चार लिंगांच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेतले जाणार आहे.
दरवर्षी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या जानेवारीतील यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा व इतर राज्यातील लाखो भाविक सोलापुरात येतात. बाराव्या शतकातील ६८ लिंगांचा जिर्णोद्धार झाल्यास पर्यटनास चालना मिळेल, या हेतूने आमदार कोठेंनी अधिवेशनात निधी मागितला होता. निधीस मान्यता मिळाल्यावर कोठे यांनी देवस्थानचे प्रमुख पदाधिकारी धर्मराज काडादी यांची भेट घेऊन चर्चा केली होती.श्री सिद्धरामेश्वर मंदिराचे काम ज्याप्रमाणे झाले, त्याच धर्तीवर दक्षिणात्य स्थापत्य कलेप्रमाणे लिंगांचाही जिर्णोद्धार होणार आहे. पहिल्या टप्प्यात आंदनकेश्वर (जुनी मिल कपांउंडजवळ), तेलेश्वर (होम मैदानाजवळ), उमा महेश्वर (काँग्रेस भवनजवळ), विश्वेश्वर (आयएमए हॉलजवळ) या चार लिंगांचे काम केले जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड