
रायगड, 26 डिसेंबर (हिं.स.)। कळंबोलीत आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत असून, त्याची राजकीय पार्श्वभूमीही तितकीच ठोस आहे. कामगार वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंबोलीला शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) बालेकिल्ला मानले जाते. येथून अनेक निष्ठावान कार्यकर्ते व नगरसेवक निवडून आले असून, त्यामध्ये आघाडीचे नाव म्हणजे गोपाल भगत.
गोपाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कळंबोलीतील सुमारे ५०० महिलांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. महिला वर्गाच्या प्रगतीसाठी ठोस आणि परिणामकारक भूमिका घ्यावी, या प्रेरणेतून गौरी कोरडे व यशोदा आलदर या महिला कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
या वेळी बोलताना गौरी कोरडे म्हणाल्या, “भारतीय जनता पक्षात प्रामाणिकपणे आणि जीव ओतून काम करूनही आमच्या अडचणींची दखल घेतली जात नसेल, तर महिलांच्या विकासासाठी ठोस भूमिका घेणाऱ्या पक्षासोबत उभे राहणे गरजेचे आहे.”
यशोदा आलदर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “महिलांसाठी भरीव आणि परिणामकारक काम करण्याची संधी आम्हाला शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मिळेल, असा विश्वास आहे.” या प्रवेश सोहळ्यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी महिलांचे स्वागत करत स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले.
ते म्हणाले, “ज्या अपेक्षा आणि विश्वासाने गौरी कोरडे व यशोदा आलदर यांनी शेतकरी कामगार पक्षाची निवड केली आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्याचे काम मी आणि माझे सर्व सहकारी निष्ठेने करू. त्यांच्या भूमिकेला न्याय देणे ही आमची जबाबदारी आहे.”
या मोठ्या महिला प्रवेशामुळे कळंबोलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, लालबावट्याची ताकद पुन्हा एकदा ठळकपणे समोर येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके