
अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.)
आत्याकडे जाण्यास निघालेल्या पत्नीला दुचाकीने सोडून देण्याची बतावणी करून तिला पतीने पाण्याने भरून वाहणाऱ्या कॅनॉलमध्ये ढकलले व तेथून पळ काढला. मात्र म्हणतात ना, की देव तारी, त्याला कोण मारी, नेमका असाच प्रत्यय या घटनेत आला. कॅनॉलच्या पाण्यातील एका झाडाचा आश्रय घेतल्याने त्या महिलेचे प्राण वाचले. तिवसा पोलिसांनी पती शिवा सवले (रा, करजगाव) याच्यासह एका १७ वर्षीय मुलास अटक केली.तिवसा येथून १५ किलोमीटर अंतरावरील पिंपळखुटा मोठा नजीकच्या कॅनॉलजवळ ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, पती-पत्नी हे काही कारणास्तव विभक्त राहत होते, मात्र त्यांचा फोन वर संवाद सुरू राहायचा. अश्यातच २१ वर्षीय पत्नी ही आकोट येथे आत्याकडे जाण्यास निघाली. तिने पतीला याबाबत सांगितले, तेव्हा पती शिवा याने तिला मीच सोडून देतो, असे म्हणत तिला दुचाकीवर बसविले. एका १७ वर्षीय मुलाससुद्धा सोबत घेतले. तिघेही दुचाकीने सातरगाव मार्गे निघाले.पिंपळखुटा नजीकच्या कॅनॉलजवळ शिवाने गाडी थांबवून त्या मुलाचय मदतीने तिचे हात-पाय पकडून तिला कॅनॉलमध्ये फेकून तेथून पळ काढला. मात्र देव तारी, त्याला कोण मारी याप्रमाणे महिला कॅनॉलमध्ये पडताच काही अंतरावरच एक झाड तिच्या हाती लागले आणि तिचा जीव कसाबसा वाचला. कॅनॉलमधून बाहेर निघून ती एका शेतातील गृहस्थाकडे गेली. तिने हकीकत सांगितली व तिवसा पोलीस स्टेशन गाठून फिर्याद नोंदविली. पोलिसांनी तक्रारीवरून पती शिवासह त्या मुलास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी