
मुंबई, 26 डिसेंबर (हिं.स.)। एक सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज अशी संस्था निर्माण करण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतातील आघाडीच्या विविधीकृत समूहांपैकी एक असलेल्या जेएसडब्ल्यू ग्रुपने आपल्या मनुष्यबळ विभागातील आपले नेतृत्व अधिक मजबूत केले आहे.
कंपनीने संदीप बत्रा यांची स्टील आणि कॉर्पोरेट विभागाचे अध्यक्ष आणि मुख्य मानव संसाधन अधिकारी (सीएचआरओ) म्हणून नियुक्ती केली आहे. जेएसडब्ल्यू स्टील आणि कॉर्पोरेट कामासाठी मनुष्यबळ, प्रतिभा आणि संस्कृतीशी संबंधित धोरणांचे नेतृत्व संदीप करतील. यात संघटनात्मक प्रभाव, नेतृत्व क्षमता, प्रतिभा व्यवस्थापन आणि भविष्यासाठी सज्ज संघटना निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
संदीप यांना आयटी, ग्राहक क्षेत्र, दूरसंचार, किरकोळ विक्री, पायाभूत सुविधा आणि विमान वाहतूक यांसारख्या विविध क्षेत्रांमधील प्रतिभा व्यवस्थापन, संस्थात्मक रचना आणि उत्पादकता वाढीचा तीन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपमध्ये येण्यापूर्वी, ते अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडमध्ये मुख्य मनुष्यबळ अधिकारी म्हणून कार्यरत होते. लँडमार्क ग्रुप आणि व्होडाफोन इंडियामध्येही त्यांनी महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी भारतीय सैन्यात कमिशन्ड अधिकारी म्हणूनही सेवा बजावली आहे.
टॅलेंट, लर्निंग अँड डेव्हलपमेंट आणि डीईआयच्या (विविधता, समानता आणि समावेशन) ग्रुप हेड म्हणून जेएसडब्ल्यूने शिल्पी लाल शर्मा यांची नियुक्ती केली आहे. समूहाची शिक्षण रचना, नेतृत्व विकास, उत्तराधिकार नियोजन, संघटनात्मक विकास आणि सर्व व्यवसायांमध्ये समावेशनाचा अजेंडा राबवण्याची जबाबदारी त्या सांभाळतील. सीएचआरओ संदीप बत्रा यांना त्या रिपोर्ट करतील.
शिल्पी यांच्याकडे टॅलेंट मॅनेजमेंट, लर्निंग अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रांतील 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे, ज्यात 15 वर्षांहून अधिक काळ त्यांनी वरिष्ठ पदांवर काम केले आहे. वेल्स्पन ग्रुपमधून त्या जेएसडब्ल्यू ग्रुपमध्ये आल्या आहेत. तिथे त्या टॅलेंट, लर्निंग आणि ओडी (संघटन विकास) विभागाचे नेतृत्व करत होत्या. यापूर्वी त्यांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट आणि एडलवाईस ॲसेट मॅनेजमेंट येथे महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
श्री. पार्थ जिंदाल म्हणाले, “विविध व्यवसायांमध्ये जेएसडब्ल्यू ग्रुप विस्तारत असताना, नेतृत्व आणि मनुष्यबळ क्षमता मजबूत करणे याला आमचे प्राधान्य आहे. भविष्यासाठी योग्य संस्था निर्माण करण्यासाठी प्रतिभा, नेतृत्व विकास आणि एका ठोस कामावर आधारित संस्कृतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कार्यक्षम संस्था उभारण्याचा संदीप यांचा व्यापक अनुभव, तर प्रतिभा, शिक्षण आणि सर्वसमावेशकता या क्षेत्रांतील शिल्पी यांचे कौशल्य, आम्हाला अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज कार्यक्षम कर्मचारी वर्ग तयार करण्यास मदत करेल. समूहाच्या दीर्घकालीन वाढीस त्याचा निश्चितच उपयोग होईल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर