
रायगड, 27 डिसेंबर (हिं.स.)। खोपोली शहरात घडलेल्या मंगेश काळोखे यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला असून, या प्रकरणाला आता गंभीर राजकीय वळण मिळाले आहे. खोपोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा प्रवक्ता भरत भगत तसेच स्थानिक निवडणुकीतील पराभूत उमेदवार व इतर सहकाऱ्यांवर हत्या व कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मंगेश काळोखे हे खोपोलीतील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. शुक्रवारी सकाळी मुलांना शाळेत सोडून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंगेश काळोखे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर खोपोली शहरात तीव्र संतापाची लाट उसळली होती.
काळोखे कुटुंबीयांनी व समर्थकांनी ही हत्या पूर्वनियोजित असून त्यामागे राजकीय वैर व निवडणुकीतील पराभवाची खदखद असल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात काही आरोपींना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
दरम्यान, आरोपींवर भारतीय दंड विधानाच्या हत्या, कट व इतर गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांनी दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली असून या हत्याप्रकरणामुळे खोपोलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके