
परभणी, 27 डिसेंबर, (हिं.स.)। परभणी शहरातील उड्डाणपूलावर धावत्या एसटी बसमध्ये अचानक धूर निघाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र बसचालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील तब्बल 35 प्रवाशांचे प्राण वाचले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
MH 20 BL 4018 क्रमांकाची वसमत आगाराची एसटी बस वसमत येथून संभाजीनगरकडे रवाना झाली होती. परभणी बसस्थानक येथे थांबून प्रवासी घेऊन पुढील प्रवासासाठी निघाली.
शहरातील उड्डाणपूलाजवळ पोहोचताच बसच्या स्टार्टमधील वायरिंगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे संपूर्ण बसमध्ये धूर पसरल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालक ज्ञानेश्वर वाकोडे यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली. चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यानंतर बसमध्ये उपलब्ध असलेल्या आग नियंत्रण सिलेंडरचा वापर करून शॉर्ट सर्किट झालेल्या ठिकाणी फवारणी करण्यात आली. त्यामुळे बसमधून निघणारा धूर थांबवण्यात यश आले. या घटनेनंतर बसमधील सर्व 35 प्रवाशांना दुसऱ्या एसटी बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. काही काळ परभणी उड्डाणपुलावर एसटी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis