
लातूर, 27 डिसेंबर (हिं.स.)।
अंगणवाडी ताई आई नव्हे, तर माता आहेत.
जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे
लातूर जिल्ह्यातील अंगणवाड्या आता केवळ खाऊ देणारी केंद्रे न राहता उज्ज्वल, सक्षम व सुसंस्कारित भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण असे कार्य करत आहेत. शासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनांना अंगणवाडी सेविकांनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिलेला असून अंगणवाडी ताई या केवळ आई नसून त्या माता आहेत, असे भावनिक व प्रेरणादायी प्रतिपादन लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
लातूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी आयोजित ‘पोषण भी, पढाई भी’ या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.
या समारोप कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मिना यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे यांनी “२०२६ मध्ये फिट अंगणवाडी ताई, फिट लातूर!” असा संकल्प अंगणवाडी सेविकांकडून करून घेतला आहे. अंगणवाडी सेविकांचे कार्य हे केवळ सेवा नसून समाजाच्या भविष्याची जडणघडण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मिना यांनी सांगितले की, ‘पोषण भी, पढाई भी’ या उपक्रमांतर्गत बालकांचा समग्र विकास साधण्यासाठी पोषण व शिक्षण यांचा अभ्यासक्रमाशी प्रभावीपणे समन्वय साधण्याचे तंत्र अंगणवाडी सेविकांना शिकविण्यात आले आहे.
नव्या अभ्यासक्रमानुसार विविध वयोगटातील मुलांसाठी शैक्षणिक व बौद्धिक उपक्रम निश्चित करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी केले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी बळीराम निपाणीकर, प्रिया तारु तसेच रॉकेट लर्निंग संस्थेचे गोपीचंद व्हनमारे व अभिजीत वीर यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी लातूर जिल्ह्यात उत्कृष्ट पद्धतीने कृती आधारित उपक्रम राबविणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रतिनिधिक स्वरूपात गोल्ड मेडल व प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रॉकेट लर्निंगच्या कार्याचा आढावा गोपीचंद व्हनमारे यांनी मान्यवरांसमोर सादर केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis