
परभणी, 27 डिसेंबर (हिं.स.)।
भारताला जागतिक पातळीवर महाशक्ती बनवायचे असेल तर देशाचा मानव विकास निर्देशांक उंचावणे अत्यावश्यक आहे. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या आधुनिक संकल्पनांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे, असे मत अणुशास्त्रज्ञ तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, संशोधनवृत्ती व सर्जनशील नवकल्पना विकसित करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय भव्य विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोस्मोपोलिटन एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी आणि परभणी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नांदखेडा रस्त्यावरील क्वीन्स स्कूल येथे सुरू झालेल्या या विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन डॉ. काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंग चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिल पोलास, सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षक, पालक, हजारो विद्यार्थी तसेच सल्लागार समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. काकोडकर म्हणाले की, शिक्षणाची योग्य जडणघडण होण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी आपले स्वतंत्र सत्व जपत गुणवत्ता टिकवून ठेवावी. ‘चांगले शिक्षण म्हणजे काय?’ याचा सातत्याने विचार करून अभ्यासक्रम काळानुरूप अद्ययावत केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
कॉस्मोपोलिटन एज्युकेशनल अॅन्ड वेलफेअर सोसायटी व सल्लागार समितीच्या वतीने बोलताना खा. डॉ. फौजिया खान यांनी सांगितले की, मानवी जीवन भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही अंगांनी समृद्ध आहे. जसे आपण सण-उत्सव साजरे करतो, तसेच विज्ञानाचाही उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. मूल्याधारित शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधता येईल.
विज्ञान महोत्सवात शास्त्रज्ञांसोबत प्रकट मुलाखत, विविध विज्ञान कृती, संशोधनपत्र सादरीकरण स्पर्धा, वैज्ञानिक प्रात्यक्षिके तसेच विद्यार्थ्यांनी साकारलेली मॉडेल्स व प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेत 100, विज्ञान प्रकल्प प्रदर्शनात 50, क्वीन्स स्कूल विज्ञान प्रकल्प स्पर्धेत 50, क्वीन्स स्कूल विज्ञान संघर्ष स्पर्धेत 100, व क्वीन्स थीम आधारित प्रदर्शनात 150 जणांनी सहभाग नोंदवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis