
अमरावती, 27 डिसेंबर, (हिं.स.)। अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, मुक्त, निर्भय व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान केंद्राध्यक्ष 1, 2 व 3 या पदांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण अभियान राबविण्यात येत आहे.
शनिवार, दि. 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सांस्कृतिक भवन आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, मतदान केंद्रावरील शिस्त, मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधा, आचारसंहिता, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वापराबाबतची माहिती तसेच आकस्मिक परिस्थितीत घ्यावयाच्या उपाययोजना यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तहसीलदार विजय लोखंडे व रवि महाले यांनी पहिल्या सत्रात प्रशिक्षण दिले. प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे शंकांचे निरसन करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना प्रक्रियेची स्पष्टता मिळाली.यावेळी निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, लोकशाही प्रक्रियेत महानगरपालिका निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून ती निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे प्रशासनाची जबाबदारी आहे. मतदान केंद्रावरील प्रत्येक कर्मचाऱ्याने नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रशिक्षणाचा पुढील टप्पा रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे. या प्रशिक्षणामुळे अमरावती महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया अधिक सक्षम होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी