
अमरावती, 27 डिसेंबर (हिं.स.)। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून इच्छुकांनी आतापासूनच कंबर कसली आहे. पहिल्या दोन दिवसांतील नामनिर्देशन पत्रांच्या विक्रीचा आकडा पाहता, यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. एकूणच निवडणुकीच्या रिंगणात भावी नगरसेवकांची मोठी भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे मतदारही संभ्रमात पडले आहेत.उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत असली, तरी अनेक इच्छुकांनी आतापासूनच गल्लीबोळांत प्रचाराचा धडाका लावला आहे. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमधील इच्छुक आघाडीवर असल्याचे दिसत आहे. 'मला पक्षाने शब्द दिला आहे, मीच उमेदवार असणार,' असा दावा करत इच्छुक मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत सकाळ-संध्याकाळ कॉर्नर सभा आणि घरोघरी जाऊन आशीर्वाद घेण्याचे सत्र सध्या प्रत्येक प्रभागात जोरात सुरू आहे.विजयाची खात्री असलेल्या पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी ओढाताण सुरू आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात पक्षांतराचे वारे वाहत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी सोयीनुसार पक्ष बदलण्याची तयारी सुरु केली आहे. उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. हेच ओळखून सर्वच मोठ्या पक्षांनी उमेदवारीचा 'सस्पेन्स' अद्याप कायम ठेवला आहे.
एका जागेसाठी अनेक दावेदार
पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अर्जची विक्री बघता राजकीय महत्त्वाकांक्षा किती वाढली आहे, हे दिसत आहे. एका मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी केवळ पक्षांतर्गतच नव्हे, तर अपक्ष म्हणूनही लढण्याची तयारी अनेकांनी दर्शवली आहे. यामुळे प्रत्येक जागा आता हॉट सीट बनली आहे. उमेदवारांची संख्या जेवढी जास्त, तेवढाच मतदारांमध्ये संभ्रम वाढणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी