
छत्रपती संभाजीनगर, 27 डिसेंबर (हिं.स.)।
नवी दिल्ली येथे वीरबालदिवस च्या औचित्याने देशभरातील २० मुलांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५’ने सन्मानित करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या छत्रपतीसंभाजीनगर येथील अर्णव महर्षी यांनाही यावेळी गौरविण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, ही बालके भारताच्या अमृतपिढीचे खरे प्रतिनिधी आहेत. शारीरिक, मानसिक, आर्थिक व इतर आव्हानांवर मात करून शौर्य, कला-संस्कृती, पर्यावरण, नवाचार, विज्ञान, समाजसेवा व क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. हा पुरस्कार युवा पिढीतील शौर्य, धैर्य आणि संवेदनशीलतेला प्रोत्साहन देणारा ठरेल. या मुलांच्या संकल्पपूर्ण प्रयत्नांमुळे २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल असा विश्वासही राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर येथील १७ वर्षीय अर्णव महर्षी याला विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रधानमंत्री ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार' प्रदान करण्यात आला. अर्णव महर्षीने लकवाग्रस्त रुग्णांच्या हातांसाठी एआय-आधारित पुनर्वास उपकरण आणि ॲक्टिव्ह हँड रिस्ट बँडचा शोध लावला आहे. अर्णव महर्षी यांनी स्मार्टफोन व लॅपटॉपच्या मदतीने हे नवोन्मेषी उपकरण विकसित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis