
बीड, 27 डिसेंबर (हिं.स.)।
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे. शहरातील के.एस.के. महाविद्यालयाच्या सभागृहात रविवार, दि.२८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची रणनिती ठरविणे, संघटन अधिक बळकट करणे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून, स्वतः इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बीड तालुक्यासाठी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, माधव निर्मळ, सतीश मुंडे व संजय आंधळे हे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. या सर्व नियोजन बैठका शंकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला भरीव यश मिळवून देण्याच्या दृष्टीने या बैठका अत्यंत महत्त्वाच्या ठरणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांनी बीड तालुक्यासाठी नियुक्त प्रभारींकडे आपले अर्ज व नाव नोंदणी करावी, असे आवाहन भाजपचे बीड ग्रामीण मंडळ प्रमुख मनोज पाटील, राणा डोईफोडे व अशोक रसाळ यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis