
चंद्रपूर, 27 डिसेंबर (हिं.स.)।
चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात नुकताच पार पडलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नवोदिता चंद्रपूर प्रस्तुत “तांडा” या दोन अंकी सामाजिक नाटकाने दैदीप्यमान यश संपादन करत नाट्यरसिक व परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्याच निर्मिती प्रयत्नात या नाटकाने एकूण आठ पारितोषिकांवर आपली मोहोर उमटवत चंद्रपूरच्या नाट्यविश्वात नवा इतिहास रचला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल एस. के. मराठी चित्रपट निर्माते, चंद्रपूर यांच्या वतीने नाटकाचे दिग्दर्शक प्रशांत कक्कड यांचा सिल्वर पत्रक देऊन विशेष सत्कार व अभिनंदन करण्यात आले. हा गौरवपूर्ण सन्मान देवा बुरडकर, प्रीतम खोब्रागडे व गणेश साळवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नाटकातील प्रशांत कक्कड, कल्याणी भट्टी, स्नेहल राऊत, बलराम सिंग सिंगर, व इत्यादी सर्व कलाकार यांनी साकारलेला अभिनय उपस्थित रसिकांनी आणि मान्यवरांनी विशेष प्रशंसनीय ठरवला.
“तांडा” हे सामाजिक वास्तव, संघर्ष आणि मानवी भावभावनांचा सखोल वेध घेणारे नाटक अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. याच विशेष प्रयोगाच्या वेळी हा सत्काराचा भावनिक, गौरवपूर्ण आणि प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला.
सामाजिक आशय, सशक्त दिग्दर्शन, प्रभावी अभिनय आणि सुस्पष्ट मांडणी यामुळे “तांडा” नाटकाला चंद्रपूरसह संपूर्ण परिसरातून भरभरून प्रतिसाद मिळत असून नवोदिता चंद्रपूरच्या संपूर्ण टीमवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हे यश चंद्रपूरच्या सांस्कृतिक परंपरेत मोलाची भर घालणारे असून स्थानिक रंगभूमीसाठी अभिमानास्पद बाब ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव