
मुंबई, २७ डिसेंबर (हिं.स.) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्याबाबत माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी आज सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान केंद्र निहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील सर्व महानगरपालिकांना दिलेल्या सुचनेनूसार, दुबार मतदार व मतदान केंद्रनिहाय मतदार यादीचे कंट्रोल चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महानगरपालिका निहाय संपूर्ण मतदारयादी जसजशी पूर्ण होईल तसतशी प्रसिद्ध करावी, असेही आदेशात नमूद केले आहे. यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक २७ डिसेंबर २०२५ तारीख निश्चित केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी