
अमरावती, 27 डिसेंबर, (हिं.स.)
सभासद व पात्र शेतकऱ्याला पिककर्ज न दिल्याप्रकरणी चांदूरबाजार तालुक्यातील तोंडगाव सेवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७८-अ (१) व (२) अन्वये संस्थेची संचालकमंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा आदेश सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चांदूरबाजार यांनी दिला आहे.
प्रियंका योगेश महल्ले या संस्थेच्या सभासद व नियमित कर्जदार असून त्यांच्या तक्रारीनंतर सदर कारवाई करण्यात आली. अर्जदार पात्र असूनही पिककर्ज वाटपात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा ठपका संस्थेवर ठेवण्यात आला आहे. याबाबत वारंवार सूचना, सुनावणी व नोटिसा देऊनही संस्थेने आदेशांचे पालन केले नाही. अर्जदार यांनी मागील तीन वर्षांत नियमित पिककर्ज घेऊन परतफेड केलेली असताना, यावेळी कर्ज नाकारण्यात आले.
बैंक व संस्थेच्या अहवालानुसार कर्जवाटपास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही संस्थेने कर्ज न दिल्याने सहकार विभागाने कठोर भूमिका घेतली. सहाय्यक निबंधक स्वरुपा प्रल्हाद जुमडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, तोंडगाव सेवा सहकारी संस्थेची संपूर्ण व्यवस्थापन समिती निष्प्रभावित करण्यात आली आहे. प्रमोद उत्तम कायंदे, सहकार अधिकारी श्रेणी १ यांची प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व माजी पदाधिकाऱ्यांना संस्थेचा सर्व रेकॉर्ड, कागदपत्रे व मालमत्ता तत्काळ प्रशासकांकडे सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सहकारी संस्थांमध्ये सभासदांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाई होणार, असा स्पष्ट संदेश सहकार विभागाकडून देण्यात आला आहे. संचालक मंडळामध्ये अध्यक्ष प्रशांत प्रल्हाद अपराधे, उपाध्यक्ष प्रकाश ओंकार मोहने, संचालक विजय नामदेम इचे, रवींद्र माणिक कडू, शेख रहीम शेख कालू, नारायण जानराव कुरवाळे, शेख समीर शेख हुसेन, नागोराव भाऊराव ठाकरे, छबू दत्तात्रय कडू, प्रतिभा प्रमोद आवारे, अशोक डोमाली कुरवाळे, विकास विश्वास मोहने, नरेंद्र मधुकर चरपे यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी