
अमरावती, 27 डिसेंबर (हिं.स.)।
ओबीसी बहुजन आघाडी महानगरपालिकेची निवडणूक यावेळी पहिल्यांदाच स्वबळावर लढवणार असून सर्व ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती ओबीसी बहुजन आघाडी प्रदेश सचिव तथा जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर यांनी दिली आहे.
अमरावती महानगरपालिकेची निवडणूक मूलभूत प्रश्नासाठी लढवली जात असली तरी राज्य शासनाकडून आरक्षणाबाबत ओबीसीवर अन्याय झालेला आहे. आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडी आपली ताकद दाखवून देईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फेलोशिप, वसतीगृह अन्य योजनेसाठी राज्य शासनाकडून मुबलक निधी दिला जात नाही, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यानुषंगाने सर्वच मुद्यावर विचार करून ही निवडणूक स्वबळावर लढवली जाणार आहे, असे सांगत इच्छुकांनी ९६३७०४६४६५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रवीण पेटकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी