
पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)।
दिवसभरातील राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून महाविकास आघाडीने एकत्र येत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय रात्री घेतला. दरम्यान, रात्री उशिरा महाविकास आघाडीतील घटक पक्षांची जागावाटपाच्या बैठकांना पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता मावळली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीसोबत राष्ट्रवादी कॉग्रेसला घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय तीन दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडीबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित बैठका घेऊन जागा वाटपाचे सूत्र देखील निश्चित झाले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहभागाला विरोध दर्शवीत पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला.
दरम्यान, कॉंग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीतही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर न जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीसोबत जाणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु