
अमरावती, 27 डिसेंबर (हिं.स.)
अचलपूर तालुक्यात मतदान केंद्रनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची पडताळणी व हरकती नोंदविण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्ष प्रमुख व प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक सकाळी ११ वाजता पार पडली.
दोन दिवस आधीच प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदान केंद्रनिहाय प्रारूप मतदार यादीतील नोंदींची शहानिशा करणे, वगळलेल्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट करणे तसेच चुकीच्या नोंदींबाबत वेळेत हरकती नोंदविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी तहसीलदार सुदर्शन शहारे यांनी मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा कणा असल्याचे नमूद केले. प्रत्येक मतदान केंद्रनिहाय यादी काळजीपूर्वक तपासून कोणतीही चूक राहू नये, यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुल गाठे, विनोद नरवाळे, शंकर मालखेडे, चेतन जवंजाळ, सतीष अशोक कुमार शर्मा, अमोल गोहाड, भैयासाहेब कांबळे, पुरुषोत्तम म. काळे आदींची उपस्थिती होती.
बैठकीच्या यशस्वी नियोजनासाठी रोशन महाकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सभेच्या शेवटी मतदार यादी पडताळणीची प्रक्रिया पारदर्शक व प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी