
सोलापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)।सोलापूर शहरातील शिवभोजन केंद्र चालकांकडे २० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या नितीन मच्छिंद्र कांबळे (रा. सदर बझार, सोलापूर) याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. इरफान युन्नूस शेख (रा. भवानी पेठ) यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.शासनाच्या नियमानुसार तुम्ही शिवभोजन केंद्र चालवत नाहीत, म्हणून संशयित आरोपी कांबळे हा फिर्यादीच्या केंद्राचे फोटो काढून अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत होता. त्याने शहरातील दोन्ही विभागातील केंद्र चालकांकडून दरमहा हप्ता सुरू केला होता. डिसेंबरमध्ये तो हप्ता वाढवून मागत होता. तो ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देत होता. ‘माझे कायद्याचा दणका साप्ताहिक असून शिवशक्ती व भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघाचा अध्यक्ष आहे’ असे म्हणून तो शिवभोजन केंद्र चालकांना त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून इरफान शेख या केंद्र चालकाने सदर बझार पोलिसांत धाव घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड