अगरबत्ती कारखान्याच्या नावाखाली सुरु असलेला अवैध गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त
नाशिक, 27 डिसेंबर (हिं.स.)। शहरात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी आणि धक्कादायक कारवाई करत अगरबत्ती कारखान्याच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध गुटखा (सुगंधित पान मसाला) कार
अगरबत्ती कारखान्याच्या नावाखाली अवैध गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त


नाशिक, 27 डिसेंबर (हिं.स.)। शहरात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी आणि धक्कादायक कारवाई करत अगरबत्ती कारखान्याच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध गुटखा (सुगंधित पान मसाला) कारखाना उद्ध्वस्त केला असून या कारवाईत सुमारे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दाढेगाव शिवारातील वालदेवी नदीलगत पिंपळगाव खांब रोड परिसरात एका शेतात उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर करत, कोणताही परवाना नसताना सुगंधित पान मसाल्याची निर्मिती करत असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान या पत्र्याच्या शेडमध्ये दोन मशिनद्वारे 'प्रिमियम राज निवास' नावाचा सुगंधित पान मसाला तयार केला जात असल्याचे आढळून आले. या ठिकाणी रामअवतार सीपू देवी दांदल (वय २४, रा. गाव भावला, नागौर, कचरास, राजस्थान) हा संशयित मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळी असलेला तयार सुगंधित पान मसाला, कच्चा माल, मशिनरी तसेच इतर साहित्य जप्त केले. संपूर्ण कारवाईत अवैधरीत्या साठवलेला व तयार केलेला सुगंधित पान मसाला, उत्पादनासाठी वापरण्यात येणारे कच्चे साहित्य, पॅकिंग साहित्य आणि मशिनरी असा एकूण ७,२९,६२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, हवालदार भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, संतोष सौंदाणे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, बाळासाहेब नांद्रे, अविनाश फुलपगारे, अर्चना भड आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही धाडसी कारवाई यशस्वी केली. अवैध गुटखा निर्मिती व विक्रीविरोधात पोलिसांची कठोर कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande