
पुणे, 27 डिसेंबर, (हिं.स.)।
महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक इच्छुक असलेल्या भाजपने महायुतीच्या जागा वगळता इतर १४० ते १४५ उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. ही यादी आता जाहीर केल्यास मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने भाजप पहिली यादी रविवारी तर नंतर बाकीच्या दोन याद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी तीन टप्प्यात यादी जाहीर करण्याची खेळी केली आहे.
भाजप २०१७ मध्ये निवडून आलेल्या ३० ते ४० माजी नगरसेवकांना नारळ देण्याची शक्यता आहे. त्यामुळे, हे इच्छुक दोन्ही राष्ट्रवादी तसेच काॅग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे, त्यांची कोंडी करण्यासाठी ही खेळी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुण्यातील उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून शहर पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून होते. शुक्रवारी संध्याकाळी ही चर्चा संपली असून पक्षाने उमेदवार निश्चित केले आहेत. हे पदाधिकारी पुण्यात परतले असून त्यांच्याकडून तिकिट निश्चित असलेल्या तसेच पहिल्या यादीतील उमेदवारांना प्रचार करण्याच्या सूचनाही दिल्याची चर्चा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु