
नांदेड, 27 डिसेंबर (हिं.स.)।
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या रेणुकादेवीचे दर्शन घेण्यासाठी नाताळच्या सुट्यांमुळे भाविकांनी गर्दी वाढली आहे. २० हजारांपेक्षा अधिक भाविकांनी मातेचे दर्शन घेतले आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीने रांगेतील शेवटच्या भाविकाला दर्शन होईपर्यंत मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज रात्री ८.३० वाजता मंदिर बंद होते, मात्र गेल्या दोन दिवसांपासून रात्रीचे ९.३० वाजेपर्यंत दर्शन सुरू होते. सध्या पहिल्या पायरीपासून गर्दी होत असून दर्शनासाठी दीड तास लागत आहे. स्कायवॉकचे काम व श्री परशुराम मंदिराच्या पायऱ्यांचे काम सुरू असल्याने नेहमीच्या एकाच मागनि ये-जा सुरू आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, दर्शनाच्या रांगेत घुसखोरी रोखता यावी, यासाठी २० स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे.
हॉटेल, धर्मशाळा फुल्ल झाल्या आहेत. मंदिर परिसरातील हॉटेल, लॉज, धर्मशाळा फुल्ल झाल्या आहेत. मंदिर समितीच्या वतीने सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नवरात्र उत्सवाप्रमाणेच गडावर पोलिस तैनात आहेत. दुकानांचे स्थलांतर करण्यात आल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला वाहने लावली जात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis