
रायगड, 27 डिसेंबर (हिं.स.)। समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथे कार्यरत असलेले साईनाथ पवार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 जाहीर झाल्याने रायगड जिल्ह्यासह सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिव्यांग क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने, चिकाटीने आणि समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या साईनाथ पवार यांच्या समाजोपयोगी कार्याची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.
साईनाथ पवार यांनी आपल्या सेवाकाळात दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, त्यांचे हक्क, पुनर्वसन, शिक्षण, रोजगार तसेच सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम, मार्गदर्शन शिबिरे, जनजागृती कार्यक्रम तसेच शासनाच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक दिव्यांग व्यक्तींना आत्मसन्मानाने जीवन जगण्याची नवी दिशा मिळाली आहे.
दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा सामाजिक व दिव्यांग क्षेत्रातील योगदानासाठी साईनाथ पवार यांची निवड करण्यात आली आहे. हा भव्य पुरस्कार सोहळा दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यास चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे.
साईनाथ पवार यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर होताच दिव्यांग संघटना, सामाजिक कार्यकर्ते, सहकारी कर्मचारी तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे रायगड जिल्ह्याचा नावलौकिक वाढला असून भविष्यातही त्यांचे समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके