
बीड, 27 डिसेंबर (हिं.स.)।
श्री शनि मंदिर संस्थान, बीड यांच्या वतीने शनि जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांच्या पावन शिव विवाह सोहळ्याचे भावपूर्ण वर्णन झाले. या प्रसंगी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. शेकडो भाविकांनी डोळ्यांत श्रद्धा, मनात भक्ती आणि ओठांवर हर हर महादेवचा जयघोष करत या दिव्य क्षणांचे साक्षीदार झाले. कथावाचक सपकाळ महाराज
यांनी शिवमहापुराणातील प्रसंग जिवंत करत श्रोत्यांच्या अंतःकरणाला स्पर्श केला. भगवान शंकरांचे वैराग्य, करुणा आणि तपश्चर्या तसेच माता पार्वतींची निष्ठा, समर्पण आणि प्रेम
यांचा संगम म्हणजे शिवविवाह असल्याचे त्यांनी सांगितले. शिव म्हणजे शांतता, समाधान आणि जीवनाचा शाश्वत आधार असा संदेश देत त्यांनी भक्तांना भक्ती, संयम आणि सदाचाराचा मार्ग दाखवला.
भक्तांच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि आध्यात्मिक ऊर्जा जागृत झाली. जीवनातील दुःख, अडचणी विसरून भक्त शिवनामात तल्लीन झाले. समाजात सद्भावना, एकात्मता आणि धर्मसंस्कारांची बीजे पेरली जात असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. श्री शनि मंदिर संस्थान, बीड यांनी या सोहळ्याचे सुयोग्य नियोजन केले आहे. भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पुढील दिवसांत शिवमहापुराण कथेचे उर्वरित चरण अधिक भक्तिभावात साजरे होणार आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवविवाहाच्या वेळी हर हर महादेव, जय शंकरा, जय भवानी या जयघोषांनी परिसर दुमदुमला. महिलांच्या मंगलगीतांनी वातावरण पवित्र झाले. फुलहार, दिव्यांचा उजाळा, धूपदीप आणि पूजाविधीमुळे भक्तिरस ओसंडून वाहिला. शिव-पार्वती स्वरूपातील सजीव सादरीकरण पाहून अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू आले. लहान मुले, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील भाविकांनी या पवित्र सोहळ्यात सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis