
परभणी, 27 डिसेंबर (हिं.स.)।
सुलतानपूरात आजपासून शांकभरी नवरात्र अखंड देवी भागवत सप्ताहास सुरुवात झाली.दररोज विविध धार्मिक कार्यक्रम शांकभरी पोर्णिमेनिमित्त आयोजन करण्यात आले आहेत.
परभणी तालुक्यातील सनपुरीनजीक सुलतानपूर (रामनगर) येथे दुर्गा माता संस्थानच्या वतीने शांकभरी नवरात्र अखंड देवी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह शनिवार 27 डिसेंबर पासून सुरू झाले आहे. यंदाचे हे सप्ताहाचे नववे वर्ष आहे.
या सप्ताहात भागवत कथेचे वाचन भिकाजी महाराज गिरी कौसडीकर करणार आहेत. सप्तशती पाठ व होम-हवन वेदशास्त्रसंपन्न बालासाहेब महाराज जोशी (सनपुरीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सप्ताहादरम्यान सकाळी काकडा, विष्णूसहस्त्रनाम, शांतीपाठ, सप्तशती पाठ, कुंकुमार्चन व ओटी भरण, भागवत, हरिपाठ, हरिकीर्तन तसेच देवीजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दररोज दुपारी 12 ते 4 या वेळेत भागवतपाठ होईल.
या निमित्ताने दररोज सायंकाळी 8 वाजता नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. शनिवार 27 डिसेंबर रोजी हभप डॉ. मुरलीधर महाराज रामनगर यांचे कीर्तन होणार असून, रविवार 28 डिसेंबर रोजी मदनराव कदम यांचा गोंधळ-जागर कार्यक्रम संपन्न होईल. सोमवार 29 डिसेंबर रोजी भागवताचार्य गजानन महाराज मांगणगावकर, मंगळवार 30 डिसेंबर रोजी काशिनाथ महाराज पिंगळीकर, बुधवार 31 डिसेंबर रोजी कुंडलिक महाराज मसलेकर तर गुरुवार 1 जानेवारी रोजी भगवान महाराज धारकर यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार 2 जानेवारी रोजी दौलत महाराज हिंगलेकर यांचे कीर्तन पार पडेल.
शनिवार 3 जानेवारी रोजी प्रकाशदेव देऊळगावकर यांचे पूजेचे कीर्तन तसेच प्रकाश महाराज मुडेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. काकड्याचे नेतृत्व बळीराम डुकरे, बाबुराव महाराज खिस्ते, अशोक वायभासे, शत्रुघ्न डुकरे, दत्तराव पुंजारे व परसराम पुंजारे करणार आहेत. शनिवार 3 जानेवारी रोजी काल्याच्या कीर्तनानंतर होम-हवन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis