
परभणी, 27 डिसेंबर (हिं.स.)।
सामाजिक जाणीव जागवणार्या ‘व्हय मी सावित्रीबाई’ नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात सादरीकरण करण्यात आले.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समिती, के.एन.पी. कॉम्प्युटर व एम.के.सी.एल. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हय मी सावित्रीबाई’ या प्रभावी नाट्यप्रयोगास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद लाभला. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित या नाटकातून सामाजिक जाणीव, स्त्रीशिक्षणाचे महत्त्व आणि परिवर्तनाची प्रेरणा प्रभावीपणे मांडण्यात आली.
या नाटकात शुभांगी भुजबळ व शिल्पा साने यांनी साकारलेल्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या. त्यांच्या सशक्त अभिनयातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा, संघर्षाचा आणि समाजपरिवर्तनाच्या प्रवासाचा प्रभावी प्रत्यय प्रेक्षकांना आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी महिला जिल्हाध्यक्ष भावनाताई नखाते, संगीता परिहार, विजयश्री पाथ्रीकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, महेश पत्रिके, आलोक मालू, मेघश्याम पत्की, राजकुमार भामंरे, मुख्य कलाकार शुभांगी भुजबळ, शिल्पा साने, संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर तसेच प्रा. स्नेहल शेळके उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित प्राध्यापक, विद्यार्थी व मान्यवरांनी नाट्यप्रयोगाचे भरभरून कौतुक केले. अशा सामाजिक आशयाच्या नाट्यप्रयोगांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होते, असे मत संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर यांनी व्यक्त केले. ‘व्हय मी सावित्रीबाई’ हा नाट्यप्रयोग केवळ मनोरंजन करणारा नसून सामाजिक विचारांना चालना देणारा ठरला असून, श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये हा कार्यक्रम विशेष संस्मरणीय ठरला.
यावेळी महिला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis