
ढाका,27 डिसेंबर (हिं.स.) । बांगलादेशमध्ये उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेली हिंसा थांबण्याचे नावच घेत नाही. हिंसक जिहादी जमावाने 2 हिंदूंची मारहाण करून हत्या केल्यानंतर आता बांगलादेशचे प्रसिद्ध गायक जेम्स यांच्या एका कार्यक्रमावरही जमावाने हल्ला केला आहे. फरीदपूर येथे शुक्रवारी रात्री होणाऱ्या ज्येष्ठ गायक जेम्स यांच्या कार्यक्रमावर जमावाने हल्ला केला. आयोजकांनी सर्व तयारी करूनही, जमावाने दगडफेक व हल्ला केल्यानंतर कार्यक्रम रद्द करण्यात आला.
यासंदर्भातील माहितीनुसार, फरीदपूर जिल्हा शाळेच्या 185व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी रात्री सुमारे 9 वाजता शाळेच्या आवारात जेम्स यांचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. आयोजन समितीच्या माहितीनुसार, प्रवेश नाकारल्यानंतर बाहेरील लोकांच्या एका गटाने जबरदस्तीने कार्यक्रमस्थळी घुसण्याचा प्रयत्न केला. आयोजकांनी त्यांना अडविल्यानंतर हिंसक जमावाने विटा आणि दगडफेक सुरू केली. जमावाने मंच ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला. फरीदपूर जिल्हा शाळेच्या विद्यार्थ्यांनी या हल्ल्याला विरोध केल्यामुळे हल्लेखोरांना माघार घ्यावी लागली. रात्री सुमारे 10 वाजता, फरीदपूरचे पोलिस उपायुक्त यांच्या निर्देशानुसार आयोजन समितीचे संयोजक मुस्तफिजुर रहमान शमीम यांनी संगीत कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली. समितीचे सदस्य राजिबुल हसन खान यांनी सांगितले की, जेम्स यांचा संगीत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व तयारी केली होती. मात्र हल्ला का झाला, त्यामागचे कारण काय होते किंवा यामागे कोण होते, हे अद्याप आम्हाला समजलेले नाही. या हल्ल्यादरम्यान विटांच्या मारामुळे फरीदपूर जिल्हा शाळेचे सुमारे 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना बांगलादेशच्या निर्वासित लेखिका तस्लीमा नसरीन यांनी देशात वाढत असलेल्या या प्रवृत्तीचा तीव्र निषेध केला आहे. यासंदर्भातील ट्विटर (एक्स) पोस्टमध्ये तस्लिमा म्हणाल्या की, सांस्कृतिक केंद्र छायानट जाळून खाक करण्यात आले आहे. संगीत, रंगभूमी, नृत्य, कविता व लोकसंस्कृतीच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष आणि प्रगतिशील जाणीव वाढवण्यासाठी स्थापन केलेल्या ‘उदिची’ या संघटनेलाही जाळून खाक करण्यात आले आहे. आज जिहाद्यांनी प्रसिद्ध गायक जेम्स यांचा कार्यक्रम थांबवला. काही दिवसांपूर्वी सिराज अली खान ढाक्याला आले होते. ते जगप्रसिद्ध उस्ताद अलाउद्दीन खान यांचे पुत्र अली अकबर खान यांचे नातू आहेत. ते ढाक्यात कार्यक्रम सादर न करताच भारतात परतले आणि त्यांनी सांगितले की, कलाकार, संगीत आणि सांस्कृतिक संस्था सुरक्षित होत नाहीत, तोपर्यंत ते बांगलादेशात येणार नाहीत.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी