
छत्रपती संभाजीनगर, 28 डिसेंबर (हिं.स.)।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी अजय शिवाजी झिंजाडे यांना औषधी वनस्पतींची अचूक ओळख पटविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपकरणाची रचना केल्याबद्दल पेटंट मिळाले आहे. त्यांनी विकसित केलेले “मेडिसिनल प्लांट आयडेंटिफिकेशन डिव्हाईस” हे उपकरण औषधी वनस्पती ओळखण्याच्या प्रक्रियेत क्रांतिकारक ठरणार आहे.
या उपकरणाच्या सहाय्याने विविध औषधी वनस्पतींची ओळख जलद, अचूक व वैज्ञानिक पद्धतीने करता येणार आहे. शेतकरी, संशोधक, विद्यार्थी, आयुर्वेदिक वैद्य तसेच वनऔषधी संवर्धन क्षेत्रातील अभ्यासकांना या उपकरणाचा मोठा लाभ होणार आहे. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधत या उपकरणाची रचना करण्यात आली आहे. पेटंट मंजूर झाल्याने अजय झिंजाडे यांच्या संशोधन कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, भविष्यात औषधी वनस्पती संवर्धन, संशोधन व आरोग्य क्षेत्रात या उपकरणाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अजय झिंजाडे हे सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील वनस्पतीशास्त्र विभागात मर रोगाच्या बुरशीचा जनुकीय अभ्यास व त्यांचे शाश्वत कृषी व्यवस्थापन या विषयावर डॉ. अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करीत आहेत. तसेच यंग सायंटिस्ट अवॉर्डही त्यांना प्राप्त झालेला आहे. या उल्लेखनीय समाजपयोगी शैक्षणिक कार्याबद्दल श्री झिंजाडे यांचे ए. सी.आर. एफ. फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला.
विभागप्रमुख डॉ अरविंद धाबे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमप्रसंगी
डॉ. डी.एस.मुकादम, डॉ.श्रीकांत माने, डॉ.अनिल कुलकर्णी व संशोधक विद्यार्थी वैभव मिसाळ, अभिषेक राऊत, विशाल हिवाळे, पल्लवी गवई उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis