
डोंबिवली, 28 डिसेंबर (हिं.स.)कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत सरकारी कर्मचारी अडकले असल्याने शहरातील कारभाराकडे दुर्लक्ष होत आहे. अशीच परिस्थिती डोंबिवलीत दिसून येत आहे. पूर्वेकडील गोग्रासवाडीतील पाथर्ली रोडचे सिमेंट काँक्रीटकरण काम जोरावर आहे. मात्र असे असले तरी रस्त्यावरील विद्युत पोल गंजुन सडला आहे. कधीही आणि कोणत्याही स्थितीत हा पडण्याची शक्यता असून या घटनेत रस्त्यावरील पादचारी जीव गमावू शकतात. येथील राजकारणीही निवडणुकीत गर्क असल्याने याकडे कोण लक्ष देणार अशी विचारणा होत आहे.
याच रस्त्यावरील सिमेंट काँक्रीटकरण काम चागल्या प्रकारे व्हावे यासाठी विभागातील लोकप्रतिनिधी नेहमी आवाज उठवत होते. यामागे काम दर्जेदार व्हावे हा उद्देश होता. मात्र आता निवडणूक काळात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आपापल्या कामात दंग असल्याचे येथील लोक सांगत आहेत. रस्त्याच्या कामामुळे बाजूच्या निमुळत्या पदपथावरून लोक ये जा करीत असून तेथेच हा सडलेला पोल उभा आहे. अनेक दिवसांपासून याच स्थितीत असल्याने जाणारी येणारी लोक जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. काही दोन चाकी चालकही येथून त्याच पोलला खेटून जात असतात. त्यांचा धक्का लागून कधीही हा पोल ढासळू शकतो अशी परिस्थिती असल्याने मोठा धोका होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत संबंधित वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi