
सोलापूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून शहरप्रमुख महेश धाराशिवकर आणि जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून हा वाद उफाळून आला असून एकमेकांविरोधात थेट आणि आक्रमक भाषा वापरण्यात आल्याने उबाठा सेनेतील अंतर्गत विसंवाद पुन्हा उघड झाला आहे.
महाविकास आघाडी अंतर्गत जागा सोडून घेण्याची जबाबदारी संबंधित पदाधिकार्यांवर सोपवण्यात आली होती. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी शहराध्यक्ष महेश धाराशिवकर यांच्यावर होती. त्यामुळे प्रभाग आठमधील एक जागा उबाठा सेनेसाठी मागणी केली होती. महाविकास आघाडीच्या जागा वाटप बैठकीत सदरची जागा काँग्रेसला सोडली. जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप शहरप्रमुखांकडून करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या बैठकीच्या ठिकाणी दोघांमध्ये तुफान शाब्दिक युद्ध झाले. जा तुला बघून घेतो, तू कोण आहेस? मुंबईला जा आणि सांगून ये, अशा शब्दांत एकमेकांवर तुटून पडत एकेरी भाषेचा वापर केला गेला. हा वाद इतका टोकाला गेला की उपस्थित उबाठाचे आणि मनसेच्या पदाधिकार्यांना मध्यस्थी करावी लागली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड