
रत्नागिरी, 28 डिसेंबर, (हिं. स.) :जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर जयगड पोलीस ठाण्याकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिर परिसर आणि समुद्रकिनाऱ्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. किनाऱ्यावरील गर्दीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून जादा कर्मचारी बंदोबस्तासाठी गणपतीपुळे येथे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे जयगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी व रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
नाताळचा पर्यटन हंगाम सुरू असल्याने विविध ठिकाणचे पर्यटक गणपतीपुळ्यात दाखल होत पर्यटकांकडून देवदर्शन आणि समुद्रस्नानाचा विशेष आनंद लुटला जात असून समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट आणि पॅराग्लायडिंगलाही पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी