
अकोला, 28 डिसेंबर (हिं.स.)।
आगामी महानगरपालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन्ही पक्षांची भूमिका जवळपास निश्चित मानली जात असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात या लढतीकडे मोठ्या राजकीय मुकाबल्याच्या रूपात पाहिले जात आहे.दरम्यान,अकोल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यातील युती जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.दोन्ही पक्ष संयुक्तपणे निवडणूक लढवण्याच्या रणनीतीवर सक्रियपणे काम करत असून याच पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ आणि प्रमुख नेते उपस्थित होते.
काँग्रेसकडून आमदार साजिद खान पठाण, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. झीशान हुसेन, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे सहभागी झाले होते.तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून जिल्हाध्यक्ष संग्राम गवांडे, महानगर अध्यक्ष रफीक सिद्दीकी, प्रदेश संघटन सचिव जावेद झकरिया हे नेते बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीची रणनीती, संघटन अधिककटीकरणाचे उपाय तसेच युतीअंतर्गत प्रभावी निवडणूक तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. एकत्रितपणे निवडणूक मैदानात उतरण्याचा आणि जनतेशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संकल्प यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.मात्र, एका प्रभागाबाबत अद्याप अंतिम सहमती झालेली नसल्याचे सांगण्यात आले. त्या प्रभागात लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली असून, अन्यथा तेथे मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता असल्याचेही सूचित करण्यात आले. उद्या सोबत सुद्धा बैठक पार पडणार असून यामध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढणार अशी घोषणा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.तर जागा वाटपा संदर्भात चर्चा सुद्धा उद्या होणार असल्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे