
अमरावती, 28 डिसेंबर (हिं.स.)।मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत तलवार घेऊन नाचणाऱ्या आदित्य उर्फ आदी संजय नागे (वय १९, रा. शिराळा) याला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तलवार जप्त केली.
शिराळा येथील रहिवाशी आदित्य उर्फ आदी नागे याच्या एका अल्पवयीन मित्राचा २४ डिसेंबर रोजी वाढदिवस होता. मित्रांनी गावातील रस्त्यावर केक कापला. त्यानंतर आदि हा मित्रांसोबत तलवार फिरवित रस्त्यावर नाचत होता. त्याचवेळी एकाने त्याचा व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ शुक्रवारी गुन्हेशाखेच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रथम या युवकाची ओळख पटविली. त्यानंतर त्याला रात्रीच शिराळा गावातून ताब्यात घेऊन तलवार जप्त केली. याघटनेत वलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आदित्य नागे याला अटककेली.गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनोने, पोलीस अंमलदार दीपक सुंदरकर, अतुल संभे, निखील गेडाम, राजिक रायलीवाले आणि सुरज चव्हाण यांनी ही कारवाई केली.
सोशल मीडियावर मागितली माफीआदित्यला अटक केल्यानंतर त्याने माझ्याकडून चूक झाली असून यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही, अशा शब्दात सोशल मीडियावर माफी मागितली त्याचा व्हिडीओसुध्दा स्वतः व्हायरल केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी