उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
मुंबई, 28 डिसेंबर (हिं.स.)। उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या
मुंबई


मुंबई, 28 डिसेंबर (हिं.स.)। उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील. असा इशारा मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिला आहे.

उन्नाव प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने सांताक्रूज ते चर्चगेट दरम्यान लोकलने प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे प्रभारी पवन मजीठिया, प्रदेश सरचिटणीस संतोष गुप्ता, उत्तर-पश्चिम जिल्हाध्यक्ष शिव जतन यादव, दक्षिण-मध्य जिल्हाध्यक्ष प्रज्ञा धावळे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास करत प्रवाशांशी थेट संवाद साधला व उन्नाव बलात्कार प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. या प्रकरणात सरकारची भूमिका किती लाजिरवाणी आहे हे जनतेसमोर मांडले.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या भाजपच्या पोकळ घोषणा आहेत. भाजपचा खरा चेहरा उन्नाव प्रकरणाने उघड झाला असून भाजप सत्तेच्या जोरावर सेंगरसारख्या बलात्कार्‍यांना वाचवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी खरोखरच संवेदनशील, संविधानिक आणि न्यायप्रिय भूमिका घेणे गरजेचे असताना भाजप सत्तेचा गैरवापर करून आरोपींना संरक्षण देत आहे. या प्रकरणात आरोपीला दिलासा देणाऱ्या सर्व निर्णयांचा निषेध करत, पीडितेला पूर्ण न्याय मिळेपर्यंत युवक काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या जनजागृती मोहिमेदरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणाचा तीव्र निषेध केला. महिलांच्या सुरक्षेच्या नावाने केवळ जाहिरातबाजी करणारा भाजप प्रत्यक्षात आरोपींच्या बाजूने उभा राहतो, हा विरोधाभास जनतेपर्यंत पोहोचवणे हाच या आंदोलनाचा उद्देश होता, असे झीनत शबरीन म्हणाल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande