
रत्नागिरी, 28 डिसेंबर, (हिं. स.) : गणपतीपुळे येथे आयोजित सरस महोत्सवादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने उभारण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षास नागरिक व पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महोत्सवाच्या पाच दिवसांत १०० हून अधिक रुग्णांची तपासणी करून घेतली. त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले. या वैद्यकीय मदत कक्षामध्ये ताप, सर्दी-खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, किरकोळ जखमांवरील प्राथमिक उपचार तसेच आवश्यक औषधोपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. महोत्सवाला उपस्थित पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनीही या सेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतत उपस्थित राहून सेवा दिल्यामुळे तातडीच्या आरोग्य समस्यांवर वेळेत उपचार शक्य झाले. सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
महोत्सवकाळात प्रभावी आरोग्य सुरक्षा व्यवस्था राबविल्याबद्दल आयोजक व आरोग्य विभागाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ही वैद्यकीय सेवा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माहेश्वरी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पनकुटे व डॉ. सुनीता पवार यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी