
अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.) शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळविण्याचे आमिष दाखवून ५२ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराला सायबर पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली. राजकुमार मुल्लू केबट (वय २४ रा. पटेल कॉलनी, पिपरीया जि. नर्मदापुरम, मध्यप्रदेश) असे त्याचे नाव आहे. शहरातील एका व्यक्तीला अनोळखी व्यक्तीने फोन केला आणि शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवीला तर मोठ्या प्रमाणात नफा मिळतो, असे आमिष दाखवून त्यांना (व्हीआयपी ७११) या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट केले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने ज्या कंपनीचे शेअर घेण्याकरिता लावले ते शेअर संबंधित व्यक्तीने ५२ लाख ५ हजार रुपयांत विकत घेतले. काही दिवसानंतर विकत घेतलेल्या शेअरचा नफा त्यांना दिसत होता. त्यामुळे त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पैसे निघत नव्हते. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीला फोन करून विचारपूस केली. त्याने पैसे परत काढण्याकरिता कमीशन व विविध टॅक्सेसची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फसगत झालेल्या व्यक्तीने सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून भऑनलाईन तपास सुरू केला, गुन्ह्यात वापरलेले एक बैंक खाते नागपूरचे होते. मात्र त्या खातेधारकाचा मोबाईल नंबर बंद होता. तो नागपूरला ज्या ठिकाणी राहत होता तिथे चौकशी केली तेव्हा राजकुमार केबट हे नाव उघड झाले आणि तो मुळ रहिवाशी मध्यप्रदेशचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांचे एक पथक दोन दिवसापासून मध्यप्रदेशात त्याच्या मागावर होते. रविवारी राजकुमार घरी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची घरझडती घेतली. त्याच्या घरात ५ क्रेडिट व डेबिट कार्ड, ८ पासबुक, ३ चेकबुक, काही आधारकार्डच्या झेरॉक्स, १ मोबाईल, २ रबरी स्टॅम्प असे साहित्य जप्त करून त्याला अटक केली. तो काही दिवस नागपूर येथे भाड्याच्या खोलीत राहीला. त्याने नागपूर येथील आधारकार्ड बनविले. त्या आधारावर एक सीमकार्ड घेऊन व बँक खाते उघडले आणि त्या खात्याचा वापर करून ५२ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. राजकुमार हा आंतरराज्यीय टोळीतील सदस्य असून वेगवेगळ्या राज्यातील २० पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरुध्द गुन्हे दाखल आहेत. त्याचे बँक खाते होल्ड करण्यात आले आहे. सायबर गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार, पोलीस अंमलदार निखील माहूरे, विशाल यादव, उल्हास टवलारे, महेश वाघमारे, नरेंद्र उघडे, अश्विन यादव, रोशन लकडे, निलेश वानखडे, अनिकेत वानखडे, करण बोरकुटे, सुषमा आठवले आणि वसीम खान यांनी ही कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी