
अकोला, 29 डिसेंबर (हिं.स.)। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग खेळण्यासाठी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर आता मोठी कारवाई होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजा संदर्भात कठोर पवित्रा घेतला असून, वापरकर्ते आणि विक्रेत्यांवर 50 हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंतचा दंड प्रस्तावित केला आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने जाहीर सूचना प्रसिद्ध केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, जर एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास, त्याच्या पालकांना 50 हजार रुपये दंड का ठोठावू नये, अशी विचारणा केली आहे. तसेच, प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजा वापरताना सापडल्यास त्यांनाही 50 हजार रुपये दंड भरावा लागेल. ज्या विक्रेत्यांकडे नायलॉन मांजाचा साठा सापडेल, त्यांना प्रत्येक उल्लंघनासाठी 2 लाख 50 हजार रुपये दंड आकारण्याची सूचना न्यायालयाने दिली आहे. ज्यांना या प्रस्तावित दंडात्मक कारवाईविरुद्ध आपले म्हणणे मांडायचे आहे, त्यांना 5 जानेवारी 2026 रोजी नागपूर खंडपीठासमोर हजर राहून आपले निवेदन सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. जर कोणीही हजर राहिले नाही, तर जनतेचा या दंडाच्या रकमेला आक्षेप नाही असे गृहीत धरून ही कारवाई अंमलात आणली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिली आहे.
सन 2021 पासून नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याचा सर्रास वापर सुरू असल्याने दरवर्षी अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण जातात किंवा गंभीर दुखापत होते. या गंभीर समस्येची दखल घेत न्यायालयाने आता आर्थिक दंड लावून अंकुश ठेवण्याचे ठरवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे