
जळगाव, 29 डिसेंबर (हिं.स.) खंडणीसाठी अपहरण झालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आज, सोमवारी (दि. २९) चाळीसगावच्या कन्नड घाटात हात-पाय बांधलेले अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील शेतकरी तुकाराम माधवराव गव्हाणे हे शनिवारी सायंकाळी उंडणगाव येथे मक्याचे पैसे घेण्यासाठी गेले होते. काही रक्कम घेऊन रात्री दुचाकीने घरी परतत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने शोध घेतला. याबाबत अजिंठा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. शनिवारी मध्यरात्री गव्हाणे यांच्या मोबाइलवरून त्यांच्या मुलाला फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याने कुटुंबीयांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, आज सकाळी चाळीसगावच्या कन्नड घाटात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत गव्हाणे यांचा मृतदेह आढळून आला. कन्नड पोलिसांनी या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, अपहरणानंतर खून करून मृतदेह घाटात फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती आहे. खोल दरीत मृतदेह फेकण्यात आल्यामुळे पोलिसांना मोठ्या प्रयत्नांनी मृतदेह बाहेर काढावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर