
मेक्सिको सिटी , 29 डिसेंबर (हिं.स.)। मेक्सिकोमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. रविवारी, 28 डिसेंबर रोजी, मेक्सिकोच्या दक्षिणेकडील ओक्साका राज्यात एका ट्रेनचे काही डबे रुळावरून घसरले. या अपघातात किमान 13 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 100 जण जखमी झाले आहेत.
मेक्सिकोच्या रेल्वे मार्गांचे संचालन करणाऱ्या मेक्सिकन नौदलाने निवेदनात सांगितले की, “या अपघाताच्या परिणामी 139 जण धोका-मुक्त आहेत, 98 जण जखमी झाले आहेत आणि दुर्दैवाने 13 जणांचा मृत्यू झाला आहे.” मेक्सिकन नौदलाच्या माहितीनुसार, या ट्रेनमध्ये एकूण 250 जण प्रवास करत होते. त्यामध्ये नऊ चालक दलाचे (क्रू मेंबर) सदस्य आणि 241 प्रवासी होते. अपघातानंतर ट्रेनमधील 193 जणांना धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे, तर 98 जण जखमी झाले आहेत. यापैकी 36 जणांना वैद्यकीय मदत दिली जात आहे.
मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शीनबाम यांनी सांगितले की, नौदल सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित भागात जाऊन बाधित कुटुंबांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशाच्या अटर्नी जनरल कार्यालयाने या अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केल्याचे सांगितले आहे. ही ट्रेन मेक्सिकोच्या आखात आणि प्रशांत महासागराच्या दरम्यान धावते तसेच प्रवासी आणि मालवाहतूक दोन्ही करते.
दक्षिण-पूर्व मेक्सिकोच्या विकासासाठी माजी राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्रेडोर यांच्या कार्यकाळात 2023 मध्ये ही रेल्वे लाईन एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आली होती.20 डिसेंबर रोजी, याच मार्गावर एक ट्रेन रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मालवाहू ट्रकला धडकली होती. मात्र, त्या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नव्हता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode