
पुणे, 3 डिसेंबर, (हिं.स.)। कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ टोळीच्या गुंडाकडे कोथरूड पोलिसांना गोळीबार केलेल्या पुंगळ्यांसह 400 काडतुसे सापडली आहेत. त्यात 200 रिकाम्या पुंगळ्या असून, 200 जिवंत काडतुसे आहेत. त्याने त्यातील पिस्तुलातून गोळ्या झाडण्याचा सराव लोणावळा येथील शेतात केला. त्यानंतर त्याने घायवळला काडतुसे दिल्यानंतर घायवळने अहिल्यानगर येथील सोनाई गावच्या शेतात गोळ्या झाडण्याचा सराव केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
अजय महादेव सरोदे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या कोथरूड गोळीबार प्रकारानंतर एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात या गुंडाला नुकतीच अटक केली असून, कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या गुंडांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्रीच्या वेळेत एका तरुणावर गोळीबार केला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु