
रायपूर, 3 डिसेंबर (हिं.स.)दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा चार विकेट्सने पराभव केला. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताने विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्या शतकांच्या जोरावर ५० षटकांत पाच बाद ३५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेने एडेन मार्करामच्या शतक आणि मॅथ्यू ब्रिट्झके आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ४९.२ षटकांत सहा बाद ३६२ धावा करून विजय निश्चित केला. या विजयासह, पाहुण्या संघाने भारतासोबतच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दोन्ही संघ आता ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात एकमेकांसमोर येतील.
तत्पूर्वी, रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली यांच्या शतकांच्या आणि केएल राहुलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५० षटकांत ५ गडी गमावून ३५८ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३५९ धावांचे लक्ष्य दिले होते.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा १४ धावांवर बाद झाला तर जयस्वाल २२ धावांवर बाद झाला. भारताने ६६ धावांवर दोन गडी गमावले होते. पण ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहलीने टीम इंडियाच डाव सावरला.
दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली. गायकवाडने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तर विराट कोहलीने आपले ५३ वे एकदिवसीय शतक आणि ८४ वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. गायकवाड १०५ धावांवर बाद झाला, तर कोहली १०२ धावांवर बाद झाला.
कोहली आणि गायकवाड फलंदाजी करत असताना, भारत सहजपणे ३५० धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत होते. पण हे दोघे बाद झाल्यानंतर धावगतीचा वेग मंदावला. शेवटी, केएल राहुलने एक बाजू लावून धरली आणि नाबाद ६६ धावा केल्या. त्याने शेवटच्या षटकात १८ धावा करून भारताला ३५० धावांचा टप्पा पार करुन दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे